बुधवार, २९ मार्च, २०१७

दुरावा

दुराव्याचे दुःख मलाही आणि तुलाही
पण हा दुरावा म्हणजे तुटणं नाही

हा तर आहे एक आरंभ
मिळविण्यासाठी नवे नभ

नाही आणणार मी डोळा आसू
जर असेल तुझ्या ओठी हसू

लवकरच संपेल हे ही सत्र
असू आपण पुन्हा एकत्र

क्षण ते असतील वेगळे
पुन्हा हसू आपण मनमोकळे

मंगळवार, २८ मार्च, २०१७

माझे आकाश...

क्षितिजाच्या पलिकडेही एक आकाश असतं
आपले आपण ते शोधायचे असत
जरी दाटले असे गडद धुके
असेल ध्यास खरा तर वाट न चुके

सुर्याची तप्तता, चंद्राची शीतलता
कधी अनुभवावी ती अबोल शांतता
सप्तरंगी इंद्रधनु शोभतसे खास
चमकणाऱ्या चांदण्यांची सुंदरशी आरास

निळ्या रंगाच्या छटा आहेत गहिरी
दिसत असे तो काळा ढग कहरी
शुभ्र पांढऱ्या कापसाच्या लाटा
अश्या या आकाशाच्या नाना छटा

माझ आकाश सापडल्याचा होतोय भास
पण तरीही मन होतय का उदास
ऐकू यावी साद आकाशाची
हीच आस आहे या मनाची

ऐकू येताच आकाशाची हाक
दिसेल रवीकिरणांची नवी झाक
दिमाखाने घेईन मी भरारी
माझी होतील क्षितिजे सारी


रविवार, १९ मार्च, २०१७

कोयनानगर ते मार्लेश्वर एक अविस्मरणीय ट्रेक

कोयनानगर ते मार्लेश्वर या ट्रेकबद्दल जेव्हा ऐकले तेव्हा माझ्याअंगी खूपच उत्साह संचारला होता. आम्हाला कदाचित रात्री दाट जंगलात राहावे लागणार होते, कारण या ट्रेकच्या मार्गावर फक्त एकच गाव आहे असे मी ऐकले होते. अन्नधान्य आणि पाणी जितके घेवून जावू शकू तितके घेवून जायचे होते. वाटेत कोणत्या संकटांना तोंड द्यावे लागेल याची आमच्या ग्रुपला कसलीच कल्पना नव्हती. घनदाट जंगलात रस्ता चुकण्याचीच जास्त शक्यता होती. आणि म्हणूनच आमच्या गटनेत्यांनी छोटाच ग्रुप घेवून जायचे असे ठरवले. आम्ही १८ मोठी माणसे आणि ९ वर्षाचा निलय असे एकूण १९ जण होतो या ट्रेकला.
७ मार्चला मुंबई सेन्ट्रलवरून चिपळूणला जाणारी बस पकडून आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. पहाटे ५:३० च्या सुमारास चिपळूणला पोहचलो. तिथून आम्हाला हेळवाकसाठी बस पकडली जी कुभार्ली घाटातून जाते. ह्या ट्रेकचे वैशिष्ट म्हणजे ह्या ट्रेकचा मार्ग घनदाट अश्या चांदोली अभयारण्यातून होता.

दिवस १ – ८ मार्च २००९
सकाळी साधरण ७ वाजता आम्ही हेळवाकला पोहचलो.

हेळवाकमध्ये न्याहारी आणि २ तास विश्रांती घेवून भैरवगडास प्रयाण केले. भैरवगडाला जाताना धनगरवाडा नावाची छोटीशी वाडी लागली, आमच्या वाटेवरची एकमेव लोकवस्ती असेलेली जागा. हेळवाकपासून साधारण २ तासांनी रामघळ लागते.


श्री रामदास स्वामी समाधीसाठी रामघळमध्ये यायचे. रामघळपासून एक मळलेली पायवाट आहे जी सरळ भैरवगडास जाते. हि वाट दाट झाडीतून आहे त्यामुळे मार्ग चुकण्याची जास्त शक्यता आहे. पण जर तुम्ही बरोबर रस्त्यावर असाल तर आधी गेलेल्या ट्रेकर्सनी केलेल्या खुणा दिसतील. ५ तास चालून झाल्यावर संध्याकाळी ४ वाजता भैरवगडावर पोहचलो.




एका बाजूला सातारा आणि एका बाजूला कोकण, असे भैरवगडाचे भोगालिक स्थान. भैरवगड हा सभोवतालीच्या परिसरावर नजर ठेवण्याच्या कामी वापरला जायचा. भैरवगडावर मंदिराशिवाय दुसरे काही खास पाहण्यासारखे नाही. मुख्य मंदिर साधे पण सुंदर आहे. मंदिरामध्ये देवी भैरी, देवी तुला आणि देवी वाघजाईच्या मूर्ती आहेत. बुरुजाजवळ दुसरे मंदिर शिवाचे आहे. मुख्य मंदिरामागे पाण्यचा स्त्रोत आहे, पण हे पाणी पिण्यासाठी वापरण्यायोग्य नाही. इथून कोकणाचे सुंदर दृश्य दिसते. बुरुजापासून थोडे खाली गेले की पाण्याची २-३ टाके आहेत पण मंदिरापासून ते फार दूर आहेत. आमच्या वेळापत्रकानुसार, रात्री भैरवगडावर वस्ती करायचा विचार होता, पण मंदिरापासून पाण्याच्या टाक्याचे अंतर लक्षात घेत आम्ही पथरपुंज गावात वस्ती करायचे असे ठरवले. आदल्या रात्रीचा प्रवास आणि सकाळपासून ८ तासचे चालणे यामुळे सर्वजण फार थकले होते. संध्याकाळी ५:३० वाजता पुन्हा चालण्यास सुरुवात केली आणि २ तासांनी पथरपुंज गावात पोहचलो.
पथरपुंज हे आमच्या मार्गातले शेवटचे मनुष्यवस्ती असलेले ठिकाण. पथरपुंजमध्ये एका गावकऱ्याच्या घरी राहिलो. अद्र्कचा गरमागरम चहा आणि टोमाटो सूप घेतल्यावर छान तरतरी आली. रात्रीचा स्वयंपाक करायला तर खूपच मजा आली. डाळ-भात, बटाटा-मटारची भाजी, लोणचे आणि पापड असा साधा पण छान मेनू होता. यम्मी ना? जेवणानंतर आम्ही छोटीशी शतपावली हि केली. पौर्णिमेची रात्र होती ती... पूर्ण चंद्र आणि चांदण्यांनी भरलेले सुंदर आकाश.... सोबतीला थंड हवा... एकदम झकास अन मन प्रसन्न करणारे वातावरण...


दिवस २ – ९ मार्च २००९
भैरवगडाऐवजी पथरपुंजमध्ये वस्ती केल्यामुळे आम्ही आमच्या वेळापत्रकानुसार पुढे होतो. पण तरीही आदल्यादिवसापेक्षा २-३ तास जास्त चालायचे असल्यामुळे लवकर सुरुवात करायचे असे ठरले. कांदापोहे आणि चहा घेवून आम्ही सकाळी ८:३० ला चालण्यास सुरुवात केली. ज्याच्या घरी आम्ही रात्री राहिलो होतो त्या गावकऱ्याने आम्हास प्रचितगडाला जाण्यास एक शॉटकट आहे जो आमचे २ तासाचे चालणे कमी करील असे सांगितलं. आम्ही त्या काकांना आम्हाला तो शॉटकट दाखविण्याची विनंती केली. साधारणत: दीड तास चालल्यानंतर आम्ही एका छोट्या नदीजवळ पोहोचलो. (जी यावेळी सुखलेली होती). नदीच्या डाव्याबाजुने प्रचीतगडला रस्ता जातो. पण तुम्ही थोडे पुढे उजव्याबाजूने गेलात तर प्रचितगाडला जाण्याचा शॉटकट दिसेल. हा रस्ता चांदोलीच्या दाट जंगलातून जातो. तुम्हाला गावकऱ्यांनी आणि ट्रेकर्सनी रस्त्यावर केलेल्या खुणाही दिसतील. थंडगार दाट सावलीतून चालताना ऊनाचा अजिबातही त्रास जाणवला नाही.
एका डोंगराच्या कडेकपारीला एक छोटासा झरा दिसला ज्याचे पाणी फारच गोड होते. आम्ही थोडावेळ तिथे विश्रांती आणि पाणी भरून घ्यायचे ठरवले. हा आम्हाला पथरपुंज ते चांदोल गावापर्यंत मिळालेला शेवटचा पाण्याचा स्त्रोत...
या डोंगर कादेकापारीला मधमाश्यांची ३-४ पोळी होती. आमच्या गोंधळामुळे त्रासून मधमाश्यांनी आमच्यावर आक्रमण केले, २-३ जणांना मधमाश्या चावाल्याही. मधमाश्याच्या हल्ल्यातून वाचाल्ण्यासाठी आम्ही चेहरा जमिनीकडे करून चक्क लोटांगण घातले. कुणी हालचाल करताना दिसला तर मधमाश्यांचा मोर्चा त्या व्यक्तीकडे जायचा. म्हणून आम्ही हालचालच न करण्याचे ठरवले. साधारण ४५-५० मिनिटे काहीही हालचाल न करता आम्ही झोपून काढली. काहीजणांनी तर छोटीशी डुलकीही काढली. अश्या तऱ्हेने आम्ही मधमाश्यांच्या हल्ल्यातून स्वत:ला वाचवून आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो.
प्रचीतगडावर दुपारी १ वाजता पोहचलो. गडावर एक मंदिर, तोफा आणि पाण्याचे टाके आहे. हा एक छोटासा गड आहे, जो घनदाट जंगलाने वेढलेला आहे. या गडाला लोक क्वचितच भेटीस येतात. प्रचित गडावर राहता येईल पण जेवणाची सोय तुमची तुम्हालाच करावी लागेल.
एक तास तिथे घालवल्यावर आम्ही पुढच्या मुक्कामासाठी रवाना झालो. प्रचितगडापर्यंतच तुम्हाला रस्ता दाखवण्यासाठीच्या खुणा दिसतील. इथून पुढचा रस्ता तुमचा तुम्हालाच नकाश्याच्या साहय्याने शोधावा लागेल.
अर्धा तास चालल्यानंतर आम्ही ‘सडा’ला पोहचलो. सडा म्हणजे अशी जागा जिथे फक्त मोठमोठ्या दगडांचा सडा पडलेला असतो. सगळीकडे काळेभोर दगडच दगड... दगडांचा समुद्रच जणू...
असे २-३ सडे पार केल्यावर आम्ही दुफाटा दिसला.एक रस्ता जो रुंदीववरून जातो तो रस्ता चांदोल गावाला पोहचणारा लांबचा मार्ग आहे. उजव्या बाजूने जाणारा रस्ता हा शॉटकट आहे.
हा शॉटकट म्हणजे कदाचित जंगलाधिकारींच्या वाहने जावून बनलेली कच्चा रस्ता आहे. इथे आम्ही चुकून रुंदिवला जाणारा रस्ता धरला होता. अर्धा तास चालल्यानंतर आम्हाला आमची चूक लक्षात आली आणि मग आम्ही वाहनांनी बनलेला कच्चा रस्ता पकडला. हा रस्ता दुतर्फा मोठ्या झाडांनी वेढलेला आहे. एकटा रस्ता आणि फक्त आमचा ग्रुप... इथे चालयाला खूप आवडले असते... पण जड सॅगशिवाय... प्रत्येकाजवळ सरासरी ८-१० किलो वजन असावे. या रस्ताने जाताना आम्हाला हरणांचा कळप, काळवीटे, वानरे आणि लांडगे पहिले. थोडं पुढे गेल्यावर ताज्या रक्ताचा सडा दिसला. कुठल्यातरी जंगली प्राण्याचे नुकतेच दुपारचे जेवण झालेले असावे. आमच्यापैकी बरेचजण घाबरलेले होते. आमच्या ग्रुपचे २ ग्रुप झालेले होते. अर्धेजण आमच्या पुढे चालत होते नि अर्धे मागे.  पण एका ठिकाणावर फक्त मी, सुजुताई आणि छोटा निलयच होतो. ना आम्हाला पुढचे लोकं दिसत होते ना मागचे. पुढे नि मागे फक्त रस्ता आणि कडेला मोठीमोठी झाडे.... दुसरे काहीही नाही.
आधी आम्ही पक्ष्यांचा खूप किलबिलाट एकाला आणि नंतर दोन डरकाळ्या... मी आणि सुजुताई खूपच घाबरलो होतो. आम्ही आमच्या ग्रुपपासून खूप लांब होतो आणि आमच्याकडे आमचा बचाव करण्यासाठी चाकू किंवा दुसरे कुठलेही हत्यार नव्हते. आम्ही दोघी एकमेकीशी आम्ही काय ऐकले याबद्दल काहीच बोललो नाही.... पण आम्ही जोरात चालायला सुरुवात केली होती. छोट्या निलयला आम्ही अचानक वेग का वाढवला हे मात्र कळत नव्हते. साधारणतः २० मिनिटांनी आम्ही पुढचा ग्रुपमधील लोकांना गाठले. आणि त्या नंतर आम्ही ग्रुपसोबत चालण्याचा प्रयत्न करीत होतो. ती आमची भीती होती जी आम्हाला आमचे गंतव्य स्थानकडे चालण्यास प्रेरित करीत होती... पण जंगल काही संपण्याचे लक्षण दिसत नव्हते... लवकरच सूर्यास्त होणार होता आणि आम्हाला त्या आधी साधारणतः संध्याकाळी ७ वाजेपर्यंत चांदोल गावात पोहचायचे होते... बऱ्याच जणांकडे रिकाम्या झालेल्या पाण्याच्या बाटल्या होत्या. तश्या एक-दोघाकडे आणीबाणी परीस्थितीमध्ये वापरता यावे म्हणून ठेवलेलं राखीव पाणी होते. पण ते पुढचा पाण्याचा स्त्रोत मिळेपर्यंत राखून ठेवायचे होते. आम्ही बाटलीच्या झाकणातून थोडं पाणी प्यायचो म्हणजे अगदी घोटभर सुद्धा पाणी नाही... कसेही करून जमवून घ्यावे लागत होते. कारण आम्ही मध्ये विश्रांतीसाठी सुद्धा थांबू शकत नव्हतो... लवकरच अंधार होणार होता आणि जंगली प्राणी शिकारीसाठीबाहेर पडायला सुरुवात झाली असती. त्या आधी एकाद्या सुरक्षित जागी पोहचणे मह्त्त्वाचे होते.
शेवटी आम्ही पठारावर पोहचलो... वाटले कि हा जंगलाचा शेवट असावा... इथे आम्ही एक रानगवा पाहिला. गवे नेहमी कळपात राहतात... पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्हाला एकच गवा दिसला होता. तो आमच्यापासून खूप लांब होता पण पठारावरून तो जाण्याची वाट पहायचे ठरवले. त्या क्षणी कुठलाही धोका घ्यायचा नव्हता. या वेळेपर्यत सततच्या ५ तासांच्या चालीने सगळे फारच थकले होते. जवळ पाणी नाही, खूपच जड सामानांनी भरलेल्या सॅग, सगळेच मरगळलेले होते. १५ मिनिटे वाट पाहिल्यानंतर गवा गेला आणि आम्ही पुन्हा पठारावर चालायला सुरुवात केली. २० मिनिटे पठारावर चालल्यावर आम्ही पुन्हा जंगलात शिरलो. आणि जंगलात शिरताच पाण्याचा एक छोटासा झरा दिसला.  वाह ते थंडगार पाणी, जणू काही अमृतच!!! अचानक सगळ्यांमध्ये एक उर्जा आली. संध्याकाळचे ७ वाजून २० मिनिटे झाली होती आणि चांडोल गाव अजून किती लांब आहे याची काहीच कल्पना नव्हती. म्हणजे पुढे जाण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. कारण ही जागा अजिबात सुरक्षित नव्हती. अंधार झाला होता आणि हिस्त्र प्राणी पाणी पिण्यासाठी या पाणवठ्यावर आली असती.
सकाळपासून चालून पायाचे तुकडे पडले होते आणि वस्ती करण्याच्या ठिकाणाचा अजून पत्ताच नव्हता. आम्ही ठरवले की ९-९:३० पर्यंत चालायचे आणि एखादे मैदान पाहून तिथे थांबायचे. रात्री आजूबाजूला आग लावून आळीपाळीने पहारा द्यायचा. शेवटी रात्री ९ वाजता एक पत्र्याचे शेड दिसलं आणि आम्ही तिथेच रहायचे ठरवले.
हे शेड अजूनही पूर्णतः बांधून झाले नव्हते. बहुदा ते वानाधिकारांचे असावे. इतके थकल्यावर कुणातही स्वयंपाक करण्याची ताकत नव्हती. मग मस्तपैकी फरसाणाची लिंबू मारून चटकन भेळ बनवली रात्रीचे जेवण म्हणून. हि जागा तशी सुरक्षित होती पण सगळेचजण मध्ये मध्ये उठून सर्वकाही आलबेल आहे कि नाही हे पहात होते.


दिवस ३ – १० मार्च २००९
एरव्ही ट्रेकला गेलो कि एकमेकांना उठवावे लागते पण त्या दिवशी सगळे अगदी सकळी ६ पासून गप्पा मारत होते. शुभ सकाळ!!! काहीजण पाण्याच्या शोधात गेले होते... आणि त्यांना काय दिसले होते? चांदोल गाव १० मिनिटे अंतरावर होते... वाह म्हणजे आम्ही आमच्या ठरलेल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो होतो!!! आमच्या वेळापत्रकानुसार चांदोल गाव हे आमचे तिसऱ्या दिवसाचे मुक्कामाचे ठिकाण होते... पण आम्ही तिथे दुसऱ्या दिवशीच पोहचलो होतो!!! हे एक मोठे यश होते... आणि ते शक्य झाले होते त्या २ शॉटकटमुळे... तुम्हाला वाटेल या चांदोल गावात लोकवस्ती असेल पण तसे नाही बर का. ३०-४० वर्षापूर्वीच या गावातील राह्वाश्यांचे स्थलांतर केलेले आहेत. गावात आहेत ती फक्त मोडकललेली काही घरे, एक छोटे मंदिर आणि दीपस्तंभ... या खुणा होत्या इथे कधीतरी लोकवस्ती असल्याच्या...
थोड्या उशिरा सुरुवात करायचे असे आम्ही ठरवले. गरमागरम उपमा आणि चहा हा होता आमचा त्या दिवसाच्या नास्ता... सगळे आराम करायच्या मूड मध्ये होते... आज आम्हाला फारसे चालवे लागणार होते... कदाचित फक्त ६-७ तासांची चाल आणि आम्ही कुंडी गावी पोहचलो असतो... सकळी १० वाजता आम्ही प्रस्थान केले. आजचा रस्ताही जंगलातून होता पण जंगल कालच्या इतके घनदाट नव्हते. अरे यार आता हे जंगल कधी संपणार... गेल्या दोन दिवसात सुर्यादेवांचा काहीही त्रास झाला नव्हता... पण आज मात्र सूर्यदेव चिडलेले वाटत होते... खूपच उष्णता जाणवत होती...


जुना कुंडी गावात जाण्याचा रस्ता आता वनरक्षकांनी बंद केला होता. पण आमच्या नशिबाने आम्हाला पांडुरंग हांडे नावाचे, गोठणे गावाचे रहिवाशी भेटले. त्यांनी आम्हाला कुंडी गावात जायचा रस्ता दाखविला. चांदोल गावाहून कुंडी गावाला पोहचण्यासाठी आम्हाला ६ तास लागले. कुंडीला आम्ही संध्याकाळी ४ वाजता पोहचलो. हे आमचे त्या दिवसाचे मुक्कमाचे ठिकाण होते. इतक्या दिवसांनी मनुष्यप्राणी पाहून किती दिलासा मिळत होता... गावकरी होळीच्या तयारीत होते... होळी है भाई होळी...


कुंडी गावच्या शाळेत मुक्काम करायचे ठरलं. हि शाळा खूपच छान आणि स्वच्छ होती. ३ दिवसांनी आम्ही अंघोळ केली. खूपच मस्त वाटत होते... सगळा थकवा निघून गेला होता. मग आम्ही गावात फेरफटका मारायला निघालो. गावच्या मधोमध गावकऱ्यांनी होळीची तयारी केली होती. सगळीकडे उत्सवाचे वातावरण होते. मी पहिल्यादाच कोकणातील होळी पाहत होते.

आमच्या ट्रेकचा शेवटचा मुक्काम होता आणि आणलेला शिधा खूपच उरला होता. म्हणून आम्ही राजेशाही जेवण करायचे असं ठरवलं. जेणेकरून जास्तीत जास्त शिधा संपवता येईल. सूप, डाळ-तडका राईस, वेगवेगळ्या भाज्या घालून केलेली बटाट्याची भाजी आणि अप्रतिम गरमागरम कांदा भजी... वाह होळीचा खास मेनू...

गावात होळी साजरी होत होती. कोकणातील छोट्या गावात होळी साजरा करण्याचा एक आगळा-वेगळा अनुभव होता हा. कुंडी गावातील गावकऱ्यांनी आम्हाला खूपच मदत केली.




दिवस ४ – ११ मार्च २००९
शुभ सकाळ!!! ट्रेकचा शेवटचा दिवस... सकाळी ५ वाजता उठून, ६ वाजता महीपत गडाला प्रस्थान केले. सकाळी ११ ची बस पकडायची असल्यामुळे पायपीट करण्याएवजी गाडीने महीपतगडाच्या पायथ्याशी गेलो. महीपत गडावर एक शिवालय आणि तोफा आहेत. पाण्याचे टाके आहे पण ते या हंगामात सुखलेले असते. ह्या गडाची अवस्था तितकीशी चांगली नाही.

गावचा पालखी-सोहळा पाहून आम्ही ११ची बस पकडली. नेर फाट्यावर उतरून मार्लेश्वरसाठी दुसरी बस पकडली.
मार्लेश्वर हे डोंगरांनी वेढलेले शिवाचे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. सगळे भक्तिरसात आकंठ बुडाले. आम्ही मार्लेश्वरला ट्रेकचे यश साजरे करीत छानपैकी फोटो काढले.

 मार्लेश्वरहून आम्ही आधी देवरुख आणि नंतर कौसुभ गावी गेलो आमच्या एका सहकाऱ्याच्या घरी गेलो. तिथून रात्री मुंबईसाठी बस पकडली.

ट्रेकचा मार्ग
मुंबई -> चिपळूण -> कुभार्ली घाट -> हेळवाक -> धनगरवाडा -> भैरवगड -> पथरपुंज गाव -> प्रचित गड -> चांदेल गाव -> कुंडी गाव -> महीपतगड -> नेर फाटा -> मार्लेश्वर -> देवरुख -> कौसुभ -> मुंबई

या ट्रेकला घ्यायची काळजी
१.     पाण्याच्या स्त्रोताजवळ शांतता राखा. मधमाश्यांनी हल्ला केला तर शात रहा आणि काहीही हालचाल न करता जमिनीकडे तोंड करून झोपा.
२.     शक्य तितके पाणी जवळ बाळगा. प्रचीतगड ते चांदोल गावापर्यंत पाण्याचा काहीच स्त्रोत नाही.
३.     पुरेसे अन्न घेवून जा. कारण चांदोलीच्या जंगलात रस्ता भटकण्याची शक्यता आहे.