शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

माणुसकीची साखळी…

२९ आँगष्टच्या पावसाने मुंबईत थैमान घातले होते. पण या संकटाच्यावेळी ज्याला जशी जमेल तशी एक मुंबईकर दुस-या मुंबईकराला मदत करीत होता… २६ जुलै २००५ च्या पावसाच्या अनुभवातून घेतलेला धडा… कुठून बरे आली असावी इतकी माणुसकी…  काहीजणांना २६ जुलै २००५ मध्ये कुणीतरी अनोळखी व्यक्तीने केलेल्या मदतीची परतफेड करायची होती तर काहीनी त्या वेळेच्या इतरांकडून ऐकलेल्या गोष्टी ऐकून प्रेरणा घेतली होती… अन्.अश्या रितीने झाली माणुसकीची साखळी तयार…

मी जेव्हा ‘Chain of Humanity' चे विडिओ पहायचे तेव्हा नेहमीच मला एक प्रश्न पडायचा की असे कसे होऊ शकतं… एक माणूस दुसऱ्याला मदत करतो … दुसरा तिसऱ्याला… आणि अशी साखळी बनतच जाते… मध्येच ही साखळी तोडण्याचा विचार करत नाही का? या प्रश्नाचे उत्तर मला आलेल्या अशाच एका अनुभवातून मिळाले…

अमेरिकेत असताना एका संध्याकाळी आम्ही Walmart मध्ये गेलो होतो… ते दिवस थंडीचे होते… अश्या बोचऱ्या थंडीत सगळे ऊबदार ठिकाणीच राहणे पसंत करतात. बाहेर अगदीच गरज असेल तरच पडतात. आम्ही तिथे पोहोचलो तर एक वयस्कर बाई बोचऱ्या थंडीत पार्किंगमध्ये ऊभी होती. आम्हाला वाटलं की ती कुणाचीतरी वाट पहात असावी. आम्हाला पहाताच ती धावत आमच्याकडे आली. एक डाँलरचं नाणं माझ्या हातावर ठेवत म्हणली “हे नाणं तिला एका माणसाने दिलेय… ते तु सामानाची trolly घेण्यासाठी वापर आणि नंतर दुसऱ्याला दे…” ती ते नाणं देण्यासाठी १५-२० मिनिटे थांबली होती…

Walmart मध्ये trolly घेण्यासाठी एक डाँलरचं नाणं वापरून कुलुप काढावे लागते आणि trolly वापरून झाली की परत जागेवर ठेवताना ते नाणं परत घ्यायचे. असो… आम्ही ते नाणं घेतले तर खरं पण ती बाई इतक्या थंडीत बाहेर फक्त नाणं देण्यासाठी उभी होती याचे आम्हाला हसूच येत होते.

आमची खरेदी करून बाहेर आलो. आता आमची पाळी होती… खरं तर ते नाणे घेऊन आम्ही घरी जाऊ शकत होतो… पण काही केले तरी मनाला पटत नव्हतं तसेच जाणे…हिच तर खरी शक्ती आहे चांगलेपणाची... त्या असह्य थंडीतही आम्ही २० मिनिटं थांबवल्यावर एक कुटुंब आले. त्यांना नाणं देवून आम्ही निघालो. हे केल्यावर जे वेगळेच समाधानवाटत होतं त्याचं वर्णन सुद्धा करता येत नाही… या अश्या माणुसकीच्या असंख्य साखळ्या अविरतपणे चालू राहोत हिच एक इच्छा…