नुकताच जागतिक महिला दिवस साजरा झाला. सगळीकडे
कौतुक आणि अभिनंदानाचा वर्षाव चालला होता महिलांवर... त्याच वेळी या दिवसाबद्दल
जोक्ससुद्धा सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाले... याच गदारोळात फेसबुकवर एक विडीओ
पहिला... काही महिलांनी काही प्रश्न उपस्थित करत जागतिक महिला दिवसावर बहिष्कार
घालण्याचे आव्हान करत असल्याचे...
त्यांनी मांडलेले प्रश्न कितीही खरे असले तरी माझ्या मनाला मी स्वत: एक स्त्री असूनही काही भिडले नाहीत. मुळात स्त्री ही गरीब, बिचारी, अबला आहे असे जे चित्र समाजात रंगवले जाते तेच मला पटत नाही. स्त्री ही आदिशक्तीचा अंश... मग ती अबला असूच शकत नाही... पण आपल्याकडे बहुमतात जर लोकं एखादे मत प्रदशीत करत असतील तर तेच अंतिम सत्य समजले जाते... स्त्री हि सबला आहे पण ती स्वतःच स्वत:ला आणि इतर स्त्रियांना कमी लेखत राहते... मग लहानपणापासूनचे संस्कारांचे ओझे बाळगत एखादा न्यूनगंड ठेवून सर्वच महिलांना कमी लेखू लागते. यात दोष तिचाही नाही. बहुमतात त्यांच्या मनावर जे बिबंवले जाते तेच त्याचे सत्य, आचारसरणी बनते.
त्यांनी मांडलेले प्रश्न कितीही खरे असले तरी माझ्या मनाला मी स्वत: एक स्त्री असूनही काही भिडले नाहीत. मुळात स्त्री ही गरीब, बिचारी, अबला आहे असे जे चित्र समाजात रंगवले जाते तेच मला पटत नाही. स्त्री ही आदिशक्तीचा अंश... मग ती अबला असूच शकत नाही... पण आपल्याकडे बहुमतात जर लोकं एखादे मत प्रदशीत करत असतील तर तेच अंतिम सत्य समजले जाते... स्त्री हि सबला आहे पण ती स्वतःच स्वत:ला आणि इतर स्त्रियांना कमी लेखत राहते... मग लहानपणापासूनचे संस्कारांचे ओझे बाळगत एखादा न्यूनगंड ठेवून सर्वच महिलांना कमी लेखू लागते. यात दोष तिचाही नाही. बहुमतात त्यांच्या मनावर जे बिबंवले जाते तेच त्याचे सत्य, आचारसरणी बनते.
पूर्वीच्या काळी घरचे कामे स्त्रिया आणि बाहेरची
कामे पुरुष अशी विभागणी असे. पण तेव्हाही स्त्री-पुरुष समानता होती. स्त्रिया
नुसत्या चूल आणिमुल यात अडकल्या नव्हत्या. नाहीतर तुम्हीच सांगा झाशीची राणी, रझिया सुलतान, अहिल्याबाई
होळकर यांना युद्धकला आणि राज्यकला अवगत असती का? पण जसजसा काळ पुढे सरकू लागला तसा कधी एका
स्त्रीनेच तर कधी पुरुषी अहंकाराने स्त्रियांना पुढे जाण्यापासून अडवले. अन मग
स्त्रियाच स्वत:ला कमी लेखू लागल्या. चुकीच्या पायंडे पडत असताना साधा विरोध
करायला सुद्धा पुढे आल्या नाहीत. का? तर हीच रीत आहे म्हणून... जर तुम्ही स्वत:च स्वत:साठी उभे रहात
नाही तर मग दुसरे तर का येतील?
काळ बदलला अन् पुरुषाच्या बरोबरीने बायकाही
बाहेर पडल्या. काही संसाराचा गाडा चालवण्यासाठी तर काही कर्तुत्व, काही तर करून
दाखविण्यासाठी. पण हे करत असतानाही घरातील कामे हि फक्त माझी एकटीची जबाबदारी आहे
अशी भावना मनातून काही गेली नाही. आणि या भावनेतूनच आले कर्तव्य. मला नेहमीच वाटते
की कुठलेही काम करताना कर्तव्याची भावना नको कारण जर तुम्ही मनापासून जर ती गोष्ट
केलीत तर आणि तरच त्यात प्रेम उतरेल पण फक्त कर्तव्य म्हणून केलेत तर ते तुम्ही
जबरदस्तीने कराल. आणि मग त्याला काहीच अर्थ रहात नाही. मनापासून जर करत असाल तर
तुम्हाला कधीच ती कामे करायचा तणाव जाणवणार नाही. कर्तव्याने तणावात वाढच होईल.
खरे तर स्त्री-पुरुष दोघे नोकरी करत असतील तर
घरातील कामे ही अतिरिक्त कामे होतात. मग ही अतिरिक्त कामेही दोघांनी वाटून घ्यावीत.
तसे करणे जर शक्य होत नसेल तर मग ती कामे दुस-याकडून करून घ्यावीत. थोडे पैसे
जातील पण तुमचा वेळ तुम्हाला आवडतील अश्या गोष्टी करण्यासाठी, तुमच्या माणसांना देता येईल की. उगाच ‘सुपरवूमन’
बनण्याचा अट्टाहास नको. कारण त्यामुळे तुमचे मन स्वस्थ राहणार नाही आणि त्यामुळे
घरातील इतरांचेही. काही काही जणींचे स्वयंपाक करणे हा एक छंद असतो. तो केल्याने
त्यांचा तणाव कमी होतो. मग करा कि बिनधास्त स्वयंपाक. आपल्या माणसाच्या चेह-यावर
आपण केलेला पदार्थ खाल्यानंतर येणारे समाधान पाहणे हाही एक आनंदाचा क्षण असतोच की...
थोडक्यात काय स्त्रियांनी स्वत:ला जे आवडते तेच करावे. जे आवडत नाही ते स्पष्टपणे
सांगावे आणि ते न करण्याचा मार्गही शोधून काढावा. एक स्त्री आनंदी असली की मग घरही
आनंदी होते. चिडचिड, वाद करण्यात स्वत:ची आणि इतरांची शक्ती फुकट घालवण्यात काय
अर्थ आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण स्त्रिया
आपल्या त्यागाचे फारच गुणगान करून लोकांची सहानुभूती मिळवत असतो. ते टाळले पाहिजे.
मुळात आपण स्त्रिया भावना व्यक्त करण्यात खूपच सराईत असतो. पुरुषांचे तसे नसते. पण
त्यामुळे ते काही भावनाहीन होत नाहीत. आई खस्ता खावून मोठे करते तर बाबा तुटकी चप्पल पुनःपुन्हा
शिवून वापरत आपले हट्ट पुरवतात. बहिण भावासाठी कितीतरी कामे करते आणि तोच भाऊ
तिच्यासाठी कधी खाऊ तर कधी स्वत:ची आवडती वस्तूही तिला देवून टाकतो. गरोदर असताना
आणि नंतरही आपण बाळामुळे आपले करिअरमध्ये ब्रेक आला म्हणून हळहळतो. खरे तर बाळाला
जशी आपली गरज असते तशीच आपल्यालाही विश्रांतीची गरज असते हे सोयीस्कररित्या
विसरतो. स्त्री जेव्हा लहान बाळाला सोडून नोकरीस गेली की केवढा मोठा त्याग करतोय
असे वाटते ना? पण समजा एखादा पुरुष नोकरीनिमित्ताने आपले घर, माणसे सोडून परदेशी जातो तेव्हा आपण काय बोलतो?
व्वा काय मस्त संधी मिळाली याला नोकरीत. का? त्याला भावना नाहीत? काहीच वाटत नसेल का त्याला
असे जाताना? पण तरीही घरातील लोकांचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी तो जातो. हा त्याचा
त्यागच नाही का? मग जर स्त्री-पुरुष दोघेही त्याग करत असतील तर
मग आपणच आपल्या त्यागाचे भांडवल का करावं? तुम्हीच विचार करून ठरवा.
स्त्री-पुरुषांना देवाने काही दैवी देणग्या
दिल्या आहेत ज्या एकाकडे आहेत तर दुस-याकडे नाहीत. याला एकच कारण ते असे की दोघे
एकमेकांना पूरक असावेत. मग आपण हा क्षेष्ठ ही क्षेष्ठ असा वाद घालवण्यात वेळ दवडणे
कितपत योग्य आहे. दोघेही आपल्याआपल्या जागी योग्यच आहेत. फरक असतो तो त्यांच्यावर
झालेल्या संस्कारांचा. या संस्कारानुसारच त्यांचे वर्तन असते.
शेवटी इतकेच सांगीन ‘सुपरवुमन’ किंवा
सर्वश्रेष्ठ न बनता फक्त माणूस बनून जगा. चुका, त्यातून शिका पण मुक्तपणे जगा. उगाच perfect बनण्याचा अट्टाहास नको. Sometimes it’s perfectly
okay to be imperfect.