हरीशचंद्रगड, गिर्यारोहकांची पंढरी... खरे तर मी
trekking म्हणजे गिर्यारोहण क्षेत्रात येण्याचे एकमेव कारण... माझा पहिला ट्रेक खर तर
सरसगड... पण एका दिवसाच्या त्या ट्रेकच्या छान अनुभवानंतर दोन दिवसांचा वस्तीचा
ट्रेक त्याच लोकांसोबत म्हणजे गिरीविहंगसोबत करायचे ठरवलं... खरे तेव्हा मला वाटले
हि नव्हते कि मी गिर्यारोहण पुढे कायम स्वरूपी करतच राहीन... साधलेघाट ते
हरीशचंद्रगड असा तो ट्रेक...
आदल्यादिवशी रात्री बोरोवलीहून बस पकडली. आम्ही
साधारण ३५-४० जण होतो. मस्त गप्पा, अंताक्षरी म्हणत प्रवास चालू होता... जसजशी
रात्र सरत होती तसे हळूहळू सगळे झोपेच्या आधीन होऊ लागले. मला मात्र प्रवासात झोप
येत नसल्याने जागी राहून बाहेरच्या अंधाराची आणि पाळणाऱ्या झाडांची मजा घेत
होते. साधारण पहाटे ४:३०- ५ च्या सुमारास
आम्ही साधलेघाटात पोहचलो. बस तिथेच सोडून आम्ही अंधारातच घाट उतरायला सुरुवात
केली. थोडसं अंतर चालल्यावर एक शाळा दिसली. तिथे आम्ही थांबलो चहा व नाश्ता करण्यसाठी.
नाश्ता आणि सकाळीची कामे आवरून आम्ही पुन्हा
चालायला सुरुवात केली. सरसगडला आलेले अमित शिंदे, अमित शिर्सेकर, राजेश जाधव, सचिन राऊत, साधना madam यांच्याशी गप्पा मारत
चालणे चालू होते. पण जसजसं ऊन वाढू लागलं तसतशी माझी battery उतरायला लागली. एक
तर उनाची सवय नाही, दुसरे पहिलाच वस्तीचा ट्रेक तर सामान खूप सारे घेतलेले.
इतकं सामान घेवून उनात चालायचं जीवावर येत होत अगदी. त्यात झोप नव्हती झालेली
त्यामुळे भर म्हणून पित्त उसळलेले. पण सांगणार कोणाला... सगळ्यांची नवीनच मैत्री
झालेली... मग काय चलते राहो... सभोवती उंच
सह्याद्रीच्या रांगा... वेगवेगळ्या आकाराचे डोंगर... मध्येमध्ये निलेशदा त्यांची
नावं सांगत होता खरा... पण त्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा माझी कडेकपारीचे फोटो
काढणे चालू होते... माझ्यासाठी हा एकदम नविन अनुभव होता... एरव्ही गाडीतून प्रवास
करताना सहयाद्री पाहिलेला... चालत रमत गमत इतक्या जवळून सह्याद्रीला पाहण्याचा
अनुभव काही न्याराच होता.
दुपारचे जेवण एका सावलीच्या ठिकाणी केले. ऊनाचा
जोर आता वाढू लागला होता. आणि त्यामुळे माझा वेग ही कमी होऊ लागला. सामान घेवून
चालणे मला जमत नाही हे अमित शिंदेच्या लक्षात आले. त्याने माझे थोडे सामान
त्याच्याकडे घेतले. पण हे ऊन... त्याचे काय... पहाटेपासून चालतोय या डोंगररंगातून
आणि अजून किती चालायचे ते हि ठावूक नाहीये... का हि लोक इतकी पायपीट करतात असा
विचार सारखा मनात येत होता.
मजल दर मजल करून आम्ही शेवटीसवा दुपारी ४ ला
पाचनई गावात पोहचलो. तिथे भगवानदादाने आमचे स्वागत केले. छान शेणाने सावरलेले घर. .
हुश चला आलो एकदाचे मुकामाच्या ठिकाणी. पण बंटीने सांगितलं कि इथे चहा घेवून गडावर
जायचे आहे. आजचा मुक्काम गडावर आहे. माझे तर त्राणच गेले ऐकून. मी विचारले “अजून
किती चालावे लागेल?” माझा अवतार पाहून सचिनने म्हटले “फक्त अर्धा तास अजून”
चहा घेतला अन मग मला उलट्या होऊ लागल्या. जागरण,
पित्त आणि ऊनाचा त्रास एकदम बाहेर पडले. पण मला थोडे बरे वाटू लागलं. एव्हाना ऊनही
कमी झाले होते. आम्ही गडावर जाण्यास सुरुवात केली. थंड हवा असल्याने गड चढण्यास
तितकासा त्रास झाला नव्हता. गडावर पोहचायला साधारण ६ वाजले असावेत. आम्ही गणेश
गुहेत सामान टाकले आणि धावत कोकणकड्याकडे निघालो...
मला कळत नव्हते कि सगळे इतकी घाई का करत आहेत
ते. साधना madam म्हणाल्या “ ते तुला कड्यावर गेल्यावर कळेल”. आम्ही कोकण कड्यावर पोहचलो अन
मी स्तब्धच झाले. सूर्यास्त होत होता.
सुर्याची सोनेरी किरणे डोंगरांवर पडून डोंगर
सोनेरी झाले होते. एका कड्याला गणपतीमुखाचा आकार तर इतका विलोभनीय दिसत होता कि मी
फक्त पाहतच राहोले. सोनेरी आकाश आणि त्यात रक्तवर्णीय गोल.
मग हळूहळू आकाश रंग बदलू लागलं. आधीचा सोनेरी
रंग जावून निळाई आणि लाल रंगाच्या छटा येवू लागल्या. अवघ्या १५ मिनिटात निसर्ग
आपले रंग बदलत होता. तिथे असलेले सगळे तल्लीन झाले होते ते सगळ पाहण्यात. आणि मला
सतावणाऱ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. इतकी पायपीट करून काय मिळणार? दिवसभराचा थकवा
कधीच पळून गेला होता. मी तर प्रेगात पडले त्या सगळ्याच वातावरणाला. असा निसर्ग
पहायचा तर सहयाद्री तुला मी नेहमीच भेटायला येईन असा निर्धारच केला मी तेव्हा.
एव्हाना अंधार पडू लागला होता. आमची पाउले आता गुहेकडे वळली मनात अभूतपूर्व असा
अनुभव घेवून. कोकणकड्याचे ते रूप आजही माझ्या मनातून जात नाही. रात्री इतर सगळे
गप्पा मारत बसले पण मी मात्र लवकर झोपले. सकाळी उठल्यावर केदारेश्वराचे दर्शन
घेवून तारामती आणि रोहिदासला भेटून आलो.
नंतर सुरु केला परतीचा प्रवास मनात अनेक आठवणी घेवून. खूप सारे शिकले मी या
दोन दिवसात. इच्छाशक्ती असेल तर सगळे करता येते. स्पर्धा नेहमी स्वत:शी करावी.
निसर्गाशिवाय दुसरा मोठा कलाकार नाही. आणि महत्त्वाचे ट्रेक करताना फक्त गरजेचे
सामान घ्यायचे.
त्याच आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि जवळजवळ १०
वर्षांनी पुन्हा हरिश्चंद्रगडाला भेटायला जायचं ठरवलं. जणू गडही मला बोलवत होता.
मी, आफरीन, समरीन, राजीव आणि अमेय असा पाच जणांचा प्लान केला. शेवटची कसारा लोकल
पकडली. तिथे एका जीपवाला आधीच सांगितला होता. लोकल पोहचताच जीपमध्ये बसून पाचनई
गाठले. गावात बराच बदल झालेला दिसला. जीपवाल्या काकांनी भगवानच्या घरी सोडलं.
त्याचा घरी थोड्या वेळ झोप काढली. सकाळी नाश्ता करून ७:३० ला गडाकडे कूच केली. मन
मात्र भगवान दादाच घराची खुण शोधात होते. शेवटी न राहवून एका आजीला भगवानदादाच्या
घराचा पत्ता विचारला. भगवानदादाला भेटल्यावर त्याने लगेच ओळखले. तो चहाचा आग्रह
करू लागला. त्याला येताना येतो सांगून पुढे निघालो.
साधारण दोन-अडीच तास चालल्यावर गडावर ११:३० ला
पोहचलो. गडाचे रूप बदलेले दिसल. गडावर अनेक छोटी बाजारपेठ तयार झालेली दिसली. आणि
आधी न पाहिलेला प्लास्टिककचराही. मन थोडं हळहळल. तुकाराम दादाकडे चहा घेतला आणि
रात्रीच्या जेवणाबद्दल सांगितलं. नंतर गणेशगुहा गाठली. सगळेच थकले होते. म्हणून
थोडा वेळ झोप काढून कोकणकड्यावर जायचे ठरवलं. मी आणि अमेय सोडून सगळे घोरू लागले.
१:३० वाजता सगळ्यांना उठवलं. झोप झाल्याने सगळे ताजेतवाने झाले होते. अमेयच्या
आईने छान जेवण दिले होते. त्यावर ताव मारला.
२:३० वाजले होते आणि कोकणकड्यावर ऊन असेल म्हणून
तारामती आणि रोहिदास करून शिडीवाटेने कोकणकड्यावर जायचे ठरले. तारामतीला जाताना एक
कुत्रा आमच्यासोबत आला. तो आमचा वाटाड्या झाला. अमेय त्याच्या मागे चालू लागला.
कुत्रा मळलेली वाट सोडून कारवीच्या रानात शिरला. तसा मी अमेयला म्हटलं “अरे हि वाट
नाही वाटत मला”. अमेय म्हणाला “अरे ये कुत्ता रोज आता है! उसे ज्यादा पता होगा ना.
इसे ही follow करते है|” मग काय शिरलो कारवीच्या रानांत.
थोडा पुढे गेल्यावर सगळ्यांच्या लक्षात आले की
आपण चुकीची वाट घेतलीय. पण आता काहीही पर्याय नव्हता. कधी climb करत तर कधी करवीशी झुंजत
शेवटी तारामती सर केलाच. तारामती climb करणारे कदाचित आम्ही पहिलेच असावोत. तिथे छान फोटो काढून
आम्ही आमचा मोर्चा रोहीदासाकडे वळविला. एव्ह्याना ४ वाजायला आले होते. रोहिदासच्या
पाठराच्या कडेला कोकणकड्यावर जायला शिडी होती. पहिली शिडी बरोबर घेतली. ती उतल्यावर
खुणां बघून रस्ता शोधू लागलो. आम्हाला दोन शिड्या आहेत हे माहित नव्हता. दुस-या
शिडीच्या जवळ गेलो होतो. पण ती पाहता उजवीकडे वळलो. वाटले कि या छोटेखानी जंगलातून
वाट असावी. आमच्यासोबत अजून एक पाच जणांचा गटही वाट भरकटला. दीड-दोन तास आम्ही जंगलात
रस्ता शोधत भटकत होतो. आमच्या जवळचे पाणी संपले होते आणि दोन तासात पोहचणार म्हणून
खाण्यासाठी काहीच नाही घेतलेले सोबत. ५:३० वाजले तसा माझा जीव कोकणकड्यासाठी तुटू
लागला. वाट काही केल्या सापडत नव्हती. शेवटी पहिल्या शिडीजवळ जावून पुन्हा सरुवात
करायचे ठरवले. शिडीजवळ पोहचलो तर अजून एक trekkersचा गट आला. त्यांनी सांगितलं की अजून एक शिडी
आहे ती उतरली कोकणकड्यावर जाता येते. आम्ही त्याच्या मागे शिडी उतरून कोकणकड्याकडे
निघालो.
कोकणकडावर पोहचताच माझ्या तोंडावर नकळत हसू आले.
रस्ता हरवल्यावर आलेला ताण कुठच्या कुठे पळून गेला होता. कडाही मला विचारत होता “काय
ग इतकी वर्षे लावलीस परत भेटायला?” कड्याची मनातल्या मनात क्षमा मागितली आणि वचन
दिले “वर्षातून एकदा तरी येईन तुला भेटायला”. तोच कडा, तोच सूर्य आणि तेच
रंगीबेरंगी आकाश... मनच भरत नव्हता...
अंधार पडू लागला तसा गुहेकडे वळलो. रात्रीचं
जेवण करून, मस्त कॅम्प फायरचा कार्यक्रम केला. सकाळी केदारश्वर दर्शन करून परतीचा
मार्ग धरला.
गड उतरल्यावर भगवानदादाकडे चहा घेत जुन्या आठवणी
जाग्या केल्या. मग गडाच्या दिशेने सलाम करत लवकरच भेटू असे म्हणत हात हलवला...