रविवार, १४ जानेवारी, २०१८

बाप हा बापच असतो जगाच्या पाठीवर कुठेही...

नेहमी आपण आईचे कौतुकाचे लेख कविता वाचतो... पण बाबांबद्दल फारच कमी लिहिलेले वाचतो... मी माझ्या पप्पांची तर लाडकी होतेच... हा लेख माझ्या पप्पांबद्दल लिहिण्यासाठी नाही तर माझ्या स्पानिश बाबाबद्दलचा आहे.

 काही वर्षांपूर्वी मला ऑफिसच्या कामानिमित्ताने स्पेनला जावे लागले होते. परका देश, त्यात तिथले लोक स्पॅनिश व्यतिरिक्त कुठलीही भाषा न बोलणारे... आणि मी पूर्णतः शाकाहारी... म्हणून ठरवलं की स्वयंपाकघर असलेलाच घर भाड्याने घ्यायचे... तसे मी घेतलेही... पण ऑफिस ते घर हे अंतर फार होते... मग ठरविले कि पहिला आठवडा तिथे टॅक्सीने करायचा आणि नंतर मग ट्रेन किवा बसने...
पहिल्या दिवशी टॅक्सीने कार्यालयात पोहचले. रिसेप्शनला कुणीतरी आत घेवून जाण्यासाठी वाट पाहत होते. इतक्यात एक साधारणतः ४० -४५ वर्षाचा गृहस्थ तिथे माझा नाव घेत आला. “हेलो, मी विक्टर, तुझ्या प्रोजेक्टचा मँनेजर” अशी स्वतःची हसत ओळख करून दिली होती. सगळ्या औपचारिकता पूर्ण करून आम्ही आत गेलो.

मी थोडे वेळेच्या आधी गेले होते म्हणून इतर येईपर्यत आम्ही वाट पाहायचे ठरवले. तोवर आम्हा दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. गप्पाच्या ओघात कळले कि या कार्यालयात फक्त विक्टरला इंलीश येत असल्याने हे प्रोजेक्ट त्याला देण्यात आले होते. त्याने मला विचारले कि मी कुठे राहणार आहे. मी माझ्या हॉटेलचा पत्ता सांगताच त्याने विचारलें “तू इतक्या लांब का हॉटेल घेतलेस? तूला रोज प्रवास करणे कठीण जाईल...” मी त्याला माझी जेवणाची अडचण सांगितली. इथे जवळपास कुठलेही हॉटेल स्वयंपाकघरसह मिळत नसल्याने नाईलाजाने दूर राहावे लागणार हे सांगितले. हे ऐकताच तो मला लगेच म्हणाला “काही काळजी करू नकोस मी तुला आजपासून रोज माझ्या कारने सोडीन.” मला वाटले “चला याचे घर माझ्या हॉटेलच्या जवळपास असेल म्हणून हा असे म्हणत असेल. माझ्यासाठी तर चांगलीच गोष्ट आहे”

पहिल्या दिवशी विक्टरने मला हॉटेलला सोडले आणि तो निघून गेला. दुस-या दिवशी सकाळी बरोबर ८ वाजता मला नेण्यासाठी हजर होता. आम्ही निघालो ऑफिससाठी... तेव्हा त्याने मला सांगितला कि त्याला त्याच्या एका मैत्रिणीलाही मध्ये घ्यायचे आहे. ती आमच्याच कार्यालयात काम करते आणि त्याच्या घराजवळच राहते... आम्ही तिला घेतले नि ऑफिसला गेलो. संध्याकाळी घरी जाताना त्याने आधी घरी सोडले अन मग मला हॉटेलवर... त्याचे घरापासून माझे हॉटेल जवळ जवळ एक तास पुढे आहे हे मला तेव्हा कळले. माझा हॉटेल आणि ऑफिस हे त्याच्या घरापासून एकदम विरुद्ध दिशेला होते. आणि तरी हा माणूस सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास जास्तीचा प्रवास करत होता माझ्यासाठी. त्याला मी म्हटले हि कि मी करेन टॅक्सी, ट्रेन किवा बसने प्रवास. पण हा काही ऐकायलाच तयार नाही. “मला काहीच त्रास होत नाही.  उलट तुलाच प्रवासाचा त्रास होईल जर तू माझे ऐकले नाहीस तर” असं म्हणून विक्टरने हा विषय तिथेच संपवला. 
कधी कधी ऑफिसमधून आम्ही जेवायला बाहेर जायचो. माझी सगळ्यात मोठी अडचण असायची कि आता काय खायचं आणि कसे मागवायचे... कारण स्पेन मध्ये इंग्लिश बोलणारा भेटण हि एक मोठे दिव्यच जणू. त्यात युरोपियन देशांत शाकाहारी जेवणाचे अर्थही आपल्या भारतापेक्षा वेगळे. भारतात अंडी, मासे, मांस हे झाले मांसाहारी पदार्थ. तर युरोपियन देशांत अंडी, मासे आणि काही काही ठिकाणी चिकनखिमा हे शाकाहारी पदार्थात गणले जातात. पण अशा वेळी विक्टरच मदत करायचा कितीतरी स्पानिश शुद्ध शाकाहारी पदार्थ त्याने खाऊ घालायचा.

 सुट्टीच्या दिवशी कुठे कुठे फिरायला जायचे हे मला बऱ्याचदा विक्टर सुचवायचा. मग मी माझ्या सुट्टीचे तसाच आयोजन करायचे. खूप सुंदर सुंदर ठिकाणं पहिली मी स्पेन मध्ये. सोल हे स्पेनमधले मध्यवर्ती ठिकाण. स्पेनच्या कुठल्याही सीमेपासून या ठिकाणचे अंतर सारखेच आहे.
 स्वतःच्या हाताने केलेला स्वयंपाक खाऊन कधी कधी कंटाळा आला कि अस्सल भारतीय जेवण खावेसे वाटायचे. आणि मग एक ठिकाण शोधून काढले जिथे भारतीय आणि पाकिस्तानी हॉटेल होते. एका शनिवारी मी त्या ठिकाणी जावूनही आले. सोमवारी मी जेव्हा विक्टरला हे सांगितले. तर मोठ्या काळजीच्या स्वरात तो म्हणाला “पुन्हा त्या ठिकाणी जावू नकोस. ते ठिकाण तुझ्यासाठी सुरुक्षित नाही. मी तुला दुसऱ्या ठिकाणचा पत्ता देतो तिथे जात जा भारतीय खाण्यासाठी.”

आमच्या बऱ्याच गप्पा व्हायच्या. विक्टरला दोन मुली होत्या एक १५ वर्षाची आणि एक ४ वर्षाची. आणि म्हणूनच तो माझ्या बाबतीत जास्त संरक्षणात्मक असावा. कारण माझा एक सहकारी नेदरलंडहून आला होता. पण त्याच्याशी याचे वागण अगदीच औपचारिक होते. या गप्पामध्ये त्याने एकदा मला सांगितलं कि त्याच्या मोठ्या मुलीचा एक मित्र आहे, पण त्याला तो तिचा प्रियकर असावा असा संशय आहे. तो मुलगा त्याला अजिबात आवडत नव्हता कारण त्याचे वागणे हिप्पी सारखं होते. त्याला मुलीचा प्रियकर असणे ह्या बद्दल काळजी नव्हती कारण स्पेनच्या संस्कृतीमध्ये हि एक साधारण गोष्ट होती. पण त्याची काळजी होती तो योग्य मुलगा नाही याची. जी एका भारतीय बापाची आपल्या मुलीच्या बाबतीत असते अगदी तशीच. आपली मुलीने योग्य जोडीदार निवडावा अन ती सुखात राहावी हीच माफक इच्छा. मोठ्या मुलीसाठी काळजी जितकी योग्य होती तितकाच लहान मुलीसाठीही. छोट्या मुलीला शिकवण्यासाठी त्याने माझ्याकडून मुळाक्षरे लिहून घेतली होती. अन मला जाणवलं कि बाबा हा बाबा कुठेही सारखाच असतो आपल्या पिल्लांसाठी.

असे बरेच प्रसंग आठवतात. पण सगळ्यात मनात घर करून गेलेला प्रसंग कि ज्या नंतर मी सुद्धा त्याला माझा स्पानिश बाबा समजायला लागले...
एकदा रात्री सोलमध्ये प्रोजेक्टच्या टीमची मेजवानी ठेवली होती. जेवण वैगेरे संपवून साधारण रात्रीचे ११ ११:३० वाजले होते. काहीजण आपल्या गाडीने तर काही टॅक्सीने घरी जावयास निघाले. मीही टॅक्सीने जाण्याच्या तयारीत होते. विक्टर माझ्याकडे आला नि म्हणाला “चल मी तुला घरी सोडतो”. मी म्हटलं कि “मी जाईन टॅक्सीने तुला उशीर होईल घरी जायला”. तर चटकन तो म्हणाला “ज्योती, तू मला माझ्या मुलीसारखी आहेस. तुझी सुरक्षितता मला माझ्या देशात खूप महत्वाची आहे. चल आता खूप उशीर झालाय मी तुला सोडतो.”

या त्याच्या वाक्याने मलाही थोडं भरून आले होते. नाहीतर परक्या देशातल्या एका मुलीसाठी कोण इतकी आपुलकी दाखवते... खरच काही नाती मनाने जोडली जातात अन ती रक्ताच्या नात्याइतकीच अतूट राहतात...

२ टिप्पण्या: